गेले दोन ते तीन दिवस कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. याच पावसामुळे डोंगराकडील मातीचा काही भाग हा महामार्गावर आला आला आहे. त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अगदीच काही दिवसांवर आलेला गणेशोत्सव या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील एक मार्गिका सुरू करण्यासाठी सुरू असलेले युद्ध पातळीवरील प्रयत्न आणि महामार्गावरील बंद पडलेले मशीन यामुळे एक लेन सुरळीत होण्याची शक्यता कमी आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. चिपळूण तालुक्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जवळ असलेल्या पेढे आणि परशुराम गावातील एकूण ५९ कुटुंबाला स्थलांतराची नोटीस देऊन पेढे परशुराम ग्रामपंचायतीवर स्थलांतराची जबाबदारी देऊन प्रशासनाची जबाबदारी संपते का? हा खरा प्रश्न या निमित्ताने पुढ आला आहे.
अलीकडे चिपळूण पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांनी गावात भेट दिली मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही अशी ही माहिती पेढे गावच्या सरपंच व उपसरपंच तुषार गमरे यांनी दिली. या विषयासाठी चिपळूण तहसीलदारांना अद्यापही वेळ मिळालेला नाही अशी धक्कादायक माहिती पेढे गावच्या सरपंच आरुषी शिंदे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ जवळ बोलताना दिली आहे.
आम्हाला तालुका प्रशासनाकडून पत्र आल्यावर आम्ही तहसीलदार,नॅशनल हायवे अथोरिटी चे अधिकारी ज्या ग्रामस्थांना स्थलांतरच्या नोटिसा दिल्या आहेत ते ग्रामस्थ अशी संयुक्त बैठक लावावी व आम्हाला वेळ द्यावी अशी लेखी मागणी करणारे पत्रच आम्ही चिपळूण तहसीलदारांना २६ जून २०२३ रोजी दिलं होतं. मात्र, या पत्रावर कोणती बैठक नाहीच पण साधे उत्तर देण्याची तसदीही चिपळूण तहसीलदारांनी घेतलेली नाही अशी धक्कादायक आणि उद्विग्न प्रतिक्रिया सरपंच आरुषी शिंदे यांनी दिली. या सगळ्या पार्श्वभूमीवर नॅशनल हायवे अथोरिटी चे अधिकारी व केंद्र शासनाच्या टेरी या संस्थेचे अधिकारी यांनी पंधरा दिवसांपूर्वी ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन सुरक्षेसाठी उपाय योजना करण्याची ग्वाही दिली आहे.